मुंबई, 28 जून : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांवर आरोप करताना चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही उदाहरण दिलं आहे.
'कोरोना व्हायरसच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला आणि देशातील जनतेला कुटुंब मानून आधार देत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडविरुद्ध नाराजीचा सूर आळवला आहे. पुत्र पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड मतदारसंघात दयनीय पराभव झाल्यामुळे ते या भागात फिरकले सुद्धा नाहीत,' असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
'मुलाचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी पालकमंत्री असूनही शहरात केवळ एकदाच दौरा केला आहे. स्वार्थापोटी जनतेकडे दुर्लक्ष करणे हे एका मोठ्या पदावर असलेल्या नेत्याला शोभा देत नाही. आपल्या पदाची जबाबदारी ते योग्यरीत्या कधी पार पाडणार?' असा खोचक सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विचारला आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 28, 2020
मुंबई प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप
'मुंबईत कोरोनाने थैमान घातलं आहे. मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढं मोठं संकट असताना प्रशासन मात्र भ्रष्टाचार करण्यात गुंतलं आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे,' असा सनसनाटी आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
संपादन - अक्षय शितोळे