पुणे, 19 डिसेंबर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोघांचंही नाव सोबत घेतलं तर कोणालाही आधी आठवेल तो पहाटेचा शपथविधी. मात्र 80 तासांसाठी भाजपसोबत हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांनी केलेल्या एका विधानामुळं आता भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील अजित पवार आमच्यासोबत येताना त्यांनी फोडलेले 28 आमदार सांभाळू शकलेले नाहीत, अशी बोचरी टीका केली आहे.
भाजपमधील काही आमदार नाराज आहेत आणि ते आमच्याकडे येऊ शकतात, असं अजित पवार म्हणाले होते. यानंतर भाजपमधील नेत्यांनी त्यांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील म्हणाले, की खरंतर अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत. मात्र, त्यांनी अशी आव्हानाची भाषा करू नये. हिवाळी अधिवेशनावेळी अजित पवारांनी दिलेल्या आव्हानाचा चंद्रकांत पाटलांनी समाचार घेतला. याचवेळी सरकार स्थापनेच्या वेळेची आठवण करुन देत, त्यांनी आमच्यासोबत येताना फोडलेले 28 आमदार ते सांभाळू शकलेले नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.
निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना माघारी फिरण्यासाठी अजित पवार यांनी साद घातली. यामुळे, भाजपच्या नेत्यांमधून याबाबत आक्रमक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनीही अजित पवार धडाडीचे नेते असल्याचे म्हणत दुसरीकडं गर्जेल ते पडतील काय? असा सणसणीत टोलाही लगावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
हिवाळी अधिवेशनाच्या वेळीदेखील भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही. यानंतर अजित पवार यांनीही मुनगंटीवारांना आव्हान देत मी तुमचे आव्हान स्वीकारतो, मला पाडून दाखवा असं उत्तर दिलं होतं.