नागपूर, 3 नोव्हेंबर : 'तुम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबद्दल काहीही म्हणाल, पण तुम्हाला काहीच कोणी म्हणायचे नाही. एकदाचे घोषित करून टाका ना, की महाराष्ट्रात आणीबाणी आहे. आता लोक थांबले आहेत फक्त की कधी निवडणूक होते आणि हे सरकार जाते,' असं म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
बहुजन कल्याण खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांचाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. 'महाविकास आघाडीच मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावत आहे. विजय वडेट्टीवार कोण आहेत? हे महाविकास आघाडीचे मंत्री आहेत. रोज येऊन एक एक वक्तव्य करतात. मुद्दाम जातीयवाद पसरवण्याचं काम हे लोक करतात,' असा आरोपही पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
- शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका अचानक जाहीर झाल्या
- तयारी झाली नाही, सतरा दिवस तयारी कशी करणार, यासंदर्भात विचारणा केली आहे
- राज्यातील संघटन मजबूत करण्यासंदर्भात जिल्ह्या जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहेत
- कांदळवन उद्धस्त करत आहेत, केंद्राच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्न नाही
- ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करत आहे
- आम्ही ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण स्वतंत्र ठेवले, न्यायालयात टिकवले
- मात्र, फूट पडून राज्य करण्याचे काम महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त काही लोकांसाठीच आहे का, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे
- समीर ठक्कर प्रकरणी राज्य सरकार दंडुकेशाही करत आहे