कोल्हापूर, 13 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर चौफेर टीका केली होती. शरद पवार यांच्या या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. तसंच यावेळी पाटील यांनी पवारांनी एक आव्हानही दिलं आहे.
'पवार साहेब तुम्ही वेगवेगळ्या लढला असता तर तुमच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 आल्या असत्या. लोकांना वाटत नाही की भाजपला सत्तेचा दर्प आला आहे. माझं खुलं आव्हान आहे, चार पक्ष वेगवगळे लढूया... पाहू कुणाच्या जागा जास्त निवडून येतात...कुणाची किती ताकद आहे बघू. गेल्या निवडणुकीत देखील आम्हाला सगळ्यात जास्त मतदान मिळालं होतं,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पाटील यांनी यावेळी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरही भाष्य केलं आहे. 'त्या त्या पक्षातील आमदारांना किंवा नेत्यांना आपला पक्ष कमकुवत वाटत असेल. त्यांना मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असेल,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये होत असलेल्या राजकीय घडामोडीचा परिणाम महाराष्ट्र वर देखील जाणवत असल्याचं चित्र आहे. राजस्थाननंतर राज्यातील परिवर्तनाबाबत भाजप नेते आशावादी आहेत. तर दुसरीकडे सरकार स्थिर राहण्याचा दावा सत्तारूढ पक्षाने केला आहे.
महाआघाडी सरकारवर टीकेची एकही संधी भाजपाने सोडली नाही. महाआघाडीचे तीन चाकी सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा मुद्दा कायम केंद्रस्थानी ठेवला आहे. कधी सेना, कधी राष्ट्रवादी भाजपच्या निशाण्यावर राहिली. ऑक्टोबर पर्यंत वाट पहा असा सूचक विधान भाजपचे नेते करताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.