जालना, 16 ऑगस्ट : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड लावणाऱ्या ईगल सिड्स कंपनीच्या मालकाला अटक करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेते व माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना एक आवाहन करत टोला लगावला आहे.
'वादा किया है तो निभाना पडेगा...', या शायराना अंदाजात बबनराव लोणीकर यांनी नवाब मलिक यांचा समाचार घेतला. ईगल कंपनीच्या बियाण्यांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसला असून सरकारने या बियाणे कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये कंपणीविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे.
कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरीही कंपनीच्या मालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान,अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत घोषणा केली की,परभणीचा पोलीस पथक पाठवून ईगल कंपनीच्या मालकाला इंदोरमधून अटक करू. याप्रकरणी आ.लोणीकरांनी मलिकांना आवाहन करत त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे ईगल कंपनीच्या मालकांना अटक करावी अन्यथा राजीनामा द्यावा. एवढंच नव्हे तर मलिकांनी ईगल कंपनीच्या मालकाला अटक करून आणली तर मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा जाहीर सत्कार करेन, असंही लोणीकर यावेळी म्हणाले.