मुंबई, 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्ली इथं शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. मात्र यावेळी झालेल्या हिंसेमुळे या आंदोलनाला गालबोट लागलं. या सगळ्या घटनेबाबत आणि एकूणच शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. त्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'सुरुवातीला शांततेत आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने गंभीरपणे घेतलं नाही. संयम संपल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती पण ते निष्क्रिय ठरले,' अशा शब्दांत शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेवर आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष यांनी पलटवार केला आहे.
'हा माणूस अनेक दशकांपासून केंद्र सरकारमध्ये मंत्री होता. युक्तिवाद पाहा. राजकारणामुळे ते हिंसेचे समर्थन करत आहेत,' असं ट्वीट बी एल संतोष यांनी केलं आहे.
This man was Minister in Union Govt for several decades . Look at the argument. Politics makes him support violence . https://t.co/gx0fQ00UX3
शरद पवार नक्की काय म्हणाले होते?
'दिल्लीतील घटनेचं समर्थन करता येणार नाही, पण ते का घडलं हे ही लक्षात घ्यायला हवं. अजूनही केंद्राने शहाणपण दाखवावा. टोकाची भूमिका सोडावी आणि अनुकूल निर्णय घ्यावा. गेल्या अनेक वर्षांपासून शांत असेलला पंजाब पुन्हा अस्वस्थ करू नका, याचं पातक मोदी सरकारने करू नये,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.