जलयुक्त शिवारची चौकशी करण्याचे आदेश, पलटवार करत भाजपने केला वेगळाच दावा

जलयुक्त शिवारची चौकशी करण्याचे आदेश, पलटवार करत भाजपने केला वेगळाच दावा

सरकारवर पलटवार करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करत राज्य सरकारने या योजनेबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याच मुद्द्यावरून सरकारवर पलटवार करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

'संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत केलेले श्रम अपार आहेत. तुम्ही या श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय?' असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात झाला याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, हे राजकीय सूड बुध्दीने सुरू आहे. कुहेतू यामागे आहे. पण होऊ दे चौकशी... हातच्या कंगणाला आरसा कशाला. अहवाल आल्यावर आघाडी सरकार तोंडावर आपटेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.

ज्या पध्दतीने मेट्रो कारशेड साठी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकार तोंडावर पडले तसेच याही चौकशीतून होईल, आज आम्ही मेट्रो कारशेडचा खरा अहवाल उघड केला. सरकारचा हट्ट उघडा पाडला त्यामुळे हे उघडे पडले ते झाकण्यासाठी आता अशा धडपडी सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे.

'भ्रष्टाचार नाहीच...', काय आहे शेलारांचा दावा?

'राज्यात जलयुक्त शिवारची एकूण 6,41,560 कामे झाली. त्यापैकी कॅगने तपासलेली कामे 1128 इतकी आहेत. म्हणजेच केवळ 0.17 टक्के कामांवरून कॅगने संपूर्ण जलयुक्त शिवारचे केलेले मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल? याचा अर्थ 99.83 टक्के कामं तपासलीच नाहीत! जलयुक्त शिवारची कामे 22,589 गावांमध्ये झाली. त्यातील कॅगने तपासली केवळ 120 गावांमध्ये. याचा अर्थ केवळ 0.53 टक्के गावं पाहिली गेली. 99.47 टक्के गावांमध्ये न जाताच तयार केलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक नव्हता. तसेच या अहवालात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. कामे 98 टक्के पूर्ण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे ज्या मंत्रीमंडळात ही योजना मंजूर झाली त्या मंत्री मंडळात शिवसेना ही सहभागी होती. त्यामुळे कोण कुणाची चौकशी करतेय? तेही एकदा जनतेला सांगा," असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 14, 2020, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading