गुहागर, 03 जानेवारी: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळात आपला समावेश न झाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची नाराजी आज अखेर शमली आहे.गुहागरमध्ये आभार मेळाव्यात भास्कर जाधव यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या खेळीचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गुहागरमध्ये आज सेनेच्या वतीने आभार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलत असताना भास्कर जाधव यांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाटेला आलेल्या 44 ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवार उभे केले होते. त्यांना भाजपनेच रसदही पुरवली होतीस असा गंभीर आरोप जाधव यांनी केला.
तसंच निवडणुकीमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये सेनेच्या कमीत कमी 85 ते 90 आमदार निवडून येतील. पूर्वीचा सर्व्हे हा भाजपचे 143 निवडून येतील, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादीचे 22 आमदार निवडून येतील, असा होता. त्यामुळे भाजपला 143 आमदार निवडून आल्यावर सेनेची गरज भासणार नाही, असा त्यांचा डाव होता, असा खुलासाही जाधव यांनी केला.
तसंच जाधव हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून सेनेला लक्ष करणाऱ्या भाजपचे वाभाडे काढले. ज्यावेळी काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींबरोबर तुम्ही आघाडी केली तेव्हा तुमचा हिंदुत्ववाद कुठे होता? नितीश कुमार यांच्यासोबत आघाडी करताना हिंदुत्ववाद कुठे होता? एवढंच नाही तर अन्य राज्यातही जेव्हा तुम्ही इतरांसोबत आघाडी केली. तेव्हा हिंदुत्ववाद कुठे होता, असा सवाल जाधव थेट भाजपला विचारला.
शिवसेना कालही हिंदुत्ववादी होती आणि आजही आहे आणि पुढेही राहील, असंही जाधव यांनी ठणकावून सांगितलं.
'सत्ता माझी आहे, पण मी सत्तेमध्ये नाही'
आज मी विरोधी पक्षामध्येही नाही. जेव्हा प्रत्यक्ष सत्तेमध्ये मी होतो तेव्हा केलेली कामं, विरोधी पक्षात असताना केलेली कामं, आणि तिसऱ्या अवस्थेमधून मला जावं लागणार आहे. ते म्हणजे सत्ता माझी आहे, पण मी सत्तेत नाही, असं म्हणत जाधव यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली.
'पाण्यातले अश्रू कधी कोणाला दिसत नाहीत'
यापुढे भास्कर जाधवच तुम्हाला तिसरं रूप पाहावं लागणार आहे. असं म्हणत तुम्ही आजवर माझी दोन रूप पाहिलीत एक म्हणजे सत्तेत असताना पालकमंत्री म्हणून लोकांच्या शेताच्या बांधावर जाऊन, वाडीवस्तीत जाऊन विकासकामं करणारा भास्कर आणि दुसरा म्हणजे विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांना आपल्या आक्रमक शैलीत बेजार करून विकास कामं करून घेणारा भास्कर. मात्र, यापुढे तुम्हाला या भास्कर जाधवच तिसरं रूप देखील पाहावं लागणार आहे, ते म्हणजे सत्ता असून सत्तेत नसलेला भास्कर. राज्यात आज सत्ता माझी आहे, पण सत्तेत मी नाही असं चित्र आहे. पण तुम्ही घाबरू नका तुम्हा सगळ्यांना दिलेला विकासाचा शब्द कधी खाली पडू देणार नाही, असं म्हणत पुढील काळात गावच्या सरपंचापासून ते दिल्लीच्या खासदारापर्यंत शिवसेनेचा भगवा फडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करूया अशी साद भास्कर जाधव यांनी गुहागरमधील मतदारांना घातली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, BJP, Devendra Fadanvis, Shivsena