Home /News /maharashtra /

'Eknath Khadse बोदवड नगरपंचायतीत हरले, आणि ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते'; गिरीश महाजनांचे खोचक टोमणे

'Eknath Khadse बोदवड नगरपंचायतीत हरले, आणि ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते'; गिरीश महाजनांचे खोचक टोमणे

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. त्यामुळे खडेस यांचा स्वत:च्या होमग्राउंडमध्ये पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला.

जळगाव, 26 जानेवारी : बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा झटका बसला आहे. कारण नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. त्यामुळे खडसे यांचा स्वत:च्या होमग्राउंडमध्ये पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला. खरंतर महाजन आणि खडसे यांच्यात नेहमी करबुरी सुरु असतात. यावेळी गिरीश महाजन यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन खडसेंना टोला लगावला आहे. "बोदवड नगरपंचायतीच्या निकालाबाबत एकनाथ खडसे यांना काही म्हणू द्या. खडसे विधानसभा निवडणुकीत पडले, आता बोदवड हारले, खरंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते", असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? "बोदवडमध्ये ते हरले आता कारण कशाला सांगता? मोठ्या मनाने सांगाना, आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही. त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काहीही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची असा प्रकार खडसेंचा सुरु आहे", असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपात काम केलं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना भाजपने संधी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे आणि फडणवीस यांच्यातील वाद अनेकदा बघायला मिळाला होता. अखेर पक्षातील गटबाजीला कंटाळून खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 'तीनही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई' "मंत्रिमंडळात तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र त्यांच्यात भांडण सुरु आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तीन पक्षांमध्ये एकमत नाही. त्यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे", अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. (महाविकास आघाडीत बिघाडी? जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण) महाजनांचा शिवसेनेवर निशाणा "शिवसेनेला यूपीमध्ये कितीही जागा लढवू द्या. मागच्या वेळेस त्यांचं डिपॉझिट गेलं होतं. शिवसेनाही आता देश काबीज करायला लागली आहे. त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे. राज्यामध्ये 55 आमदारांच्या भरोशावर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला", असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला. तसेच "महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. अर्धा डझन मंत्री चौकशीच्या फेऱ्यात असून ते जेलमध्ये आहेत. शिवसेना पक्ष सगळीकडे उमेदवार उभा करतो आणि डिपॉझिट गमावून बसतो यात काय पुरुषार्थ आहे?", असा खोचक सवाल त्यांनी केली. 'टिपू सुलतान नावाला विरोधच' दरम्यान, मुंबईच्या मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याच्या निर्णयाला गिरीश महाजन यांनीदेखील विरोध केला आहे. टिपू सुलतान क्रीडांगण नाव देण्यास भारतीय जनता पक्षाचा 100 टक्के विरोध आहे, असं महाजन म्हणाले आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन आज मालाडमध्ये मोठा गदारोळ झाला. भाजप पुरस्कृत शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. त्यानी टिपू सुलताना यांच्या नावाला विरोध केला. विशेष म्हणजे भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि खासदार गोपाळ शेट्टी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या