Elec-widget

'...म्हणून घेतला प्रकल्प थांबवण्याचा निर्णय', 'ठाकरे' सरकारवर भाजपचा गंभीर आरोप

'...म्हणून घेतला प्रकल्प थांबवण्याचा निर्णय', 'ठाकरे' सरकारवर भाजपचा गंभीर आरोप

प्रकल्पांना थांबवत कंत्राटदारांना भेटायला या असं सांगणं असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : गेल्या सरकारच्या प्रकल्पांची उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून सद्यस्थिती जाणून घेण्याच्या प्रयत्नावरुन आता राजकारण तापू लागलं आहे. सरकारचा हा सगळा प्रकार म्हणजे पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांना थांबवत कंत्राटदारांना भेटायला या असं सांगणं असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

'आरे' येथील मेट्रो कारशेडला विरोध करणारे आंदोलक आणि नाणार इथल्या ऑईल रिफायनरी प्रकरणातील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा पुनर्विचार होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी सरकारवर तिखट हल्ला केला आहे. त्यामुळे पुढील काळात शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी होणार अशीच चिन्हं आहेत.

उद्धव ठाकरे यांचे दोन मोठे निर्णय

आरे कारशेडच्या बांधकामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. तसंच आरे कारशेडविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. आरे कार शेड मधील झाडं तोडताना पर्यावरण कार्यकर्त्यांनी वृक्ष तोडीला विरोध करत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पर्यावरण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हेच गुन्हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

तर दुसरीकडे, नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातल्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्यात येणार असल्यानं कोकणातल्या आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलनात उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकल्प रायगडला हलविण्यात येणार असल्याची घोषणाही तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com