कोल्हापूर, 24 जुलै : भाजप नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनीच या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. सुप्रियाताई सुळे आणि धनंजय महाडिक भेटीने कोल्हापुरात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत मोठी पडझड झाली. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडून तत्कालीन सत्ताधारी पक्षात दाखल झाले. मात्र निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेले धनंजय महाडिक हे विधानसभेपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले. साखर कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा झाली. त्यानंतर आताही याच मुद्द्यावरून धनंजय महाडिक यांनी राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. 'ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी होती,' असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिलं आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या इतर नेत्यांसह धनजंय महाडिक हेदेखील उपस्थित होते.
साखर उद्योगासाठीच फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्याचं सांगण्यात आलं होतं. 'शेतकर्यांना एफआरपी मिळायला हवी आणि साखर उद्योग सुद्धा चालला पाहिजे, या उद्देशातून साखर उद्योगातील अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. साखर उद्योगांना पॅकेज द्यायला हवे, अशी मागणी केली. एमएसपी, कर्जाचे पुनर्गठन, सॉफ्ट लोन अशा अनेक मागण्या आम्ही केल्या. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. केंद्र सरकारने अतिशय चांगले इथेनॉल धोरण तयार केले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भात सुद्धा यावेळी चर्चा केली. शेतकर्यांना एफआरपी मिळावी म्हणून एमएसपीत वाढ करण्यासंदर्भातील मागणी केली,' अशी माहिती अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.