गॅंगवारने भुसावळ हादरलं, सिनेस्टाइल पाठलाग करून भाजप नगरसेवकासह 5 जणांची हत्या

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसावळ शहर गॅंगवारने हादरलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 05:09 PM IST

गॅंगवारने भुसावळ हादरलं, सिनेस्टाइल पाठलाग करून भाजप नगरसेवकासह 5 जणांची हत्या

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ,7 ऑक्टोबर: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसावळ शहर गॅंगवारने हादरलं आहे. भाजपचे (आठवले गट) नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह कुटुंबावर घरात घुसून मारेकऱ्यांना अंदाधूंद गोळीबार केला. नंतर चाकू आणि गुप्तीने सपासप वार केले. यात नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. आरपीडी रोडवरील मध्य रेल्वे हॉस्पिटल परिसरातील लाल चर्चसमोर समतानगर भागात रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा थरार घडला.

सागर रवींद्र खरात, हंसराज रवींद्र खरात, रवींद्र उर्फ हंप्या बाबुराव खरात, सुनील बाबुराव खरात आणि मोहित गजरे यांचा मृतांत समावेश आहे. घटनेच्या तीन तासांनी संशयित आरोपी शेखर मेघे, मोहसीन अजगर खान आणि मयुरेश सुरडकर या तिघांनी जळगाव एलसीबीकडे शरणागती पत्करल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून हे गॅंगवार झाल्याचे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले आहे.

सिनेस्टाइल पाठलाग करून केला अंदाधूंद गोळीबार...

मिळालेली माहिती अशी की, मारेकऱ्यांनी पाठलाग करून खरात कुटुंबीयांवर अंदाधूंद गोळीबार केला. मारेकऱ्यांनी प्रथम नगरसेवक खरात यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (वय-48) यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार करत चाकूने सपासप वार केले. त्यामुळे आरडाओरड झाल्यानंतर नगरसेवक रवींद्र खरात त्यांच्या कुटुंबीयांसह घराबाहेर निघाले. त्याचवेळी खरात यांची मुले प्रेमसागर रवींद्र खरात, हंसराज उर्फ सोनू रवींद्र खरात हे दुचाकीने महात्मा गांधी पुतळ्याकडे जीव वाचवण्यासाठी लगबगीने निघाले. हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते. रेल्वे हॉस्पिटल परिसरात हल्लेखोरांनी सिनेस्टाइल पाठलाग करून त्यांच्यावरही अंदाधूंद गोळीबार केला. नगरसेवक रवींद्र खरात या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी रजनी रवींद्र खरात, मुलगा मयूर खरात , हंसराज खरात आणि सूरज सपकाळे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड यांनी आरपीडी रोडवरील लाल चर्च परिसर तसेच खरात यांचे निवासस्थान असलेल्या समतानगरात पाहणी केली. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनीही भुसावळात घटनास्थळी पाहणी केली.

Loading...

गोदावरी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी शहरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली. तसेच गोदावरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जखमींना नेल्याची माहिती मिळाल्याने, हॉस्पिटलमध्येही गर्दी उसळली. घटनेनंतर सुनील खरात यांचा मृतदेह घटनास्थळीच होता, तर प्रेमसागर रवींद्र खरात, मोहित गजरे यांचे मृतदेह मानवतकर हॉस्पिटलमध्ये नेले होते. नगरसेवक रवींद्र खरात यांचा मृतदेह जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला होता. रात्री उशीरा शहरातून चार मृतदेह जळगाव येथे हलवण्यात आले. पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी जिल्हा रुग्णालयाला स्वत: भेट देत जखमी रीतिक खरात याचा जबाब घेतला. या वेळी निलाभ रोहन यांच्यासह जिल्हा रुग्णालयाला पोलिसांचा मोठा गराडा होता.

पत्नीचा उपचारास नकार बसून राहिली मृतदेहाजवळ...

मृत रवींद्र खरात यांना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या पत्नी रजनी ह्या त्यांच्या मृतदेहाजवळ बसून होत्या. त्यांच्या डोक्यातून रक्त भळभळत होते. तरी देखील त्यांनी उपचारास नकार दिला. आपल्या जखमी मुलाला आपला दुसरा मुलगा कसा आहे? असे सतत विचारत होती. मुलगा रीतिकने तो व्यवस्थित असून वडिलांची शपथ देत आईला जखमेवर उपचार करून घेण्यास भाग पाडले.

यावरून सोनवणे-खरात यांच्यात होता वाद..

दरम्यान, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदावरून फेब्रुवारी महिन्यात नगरसेवक रवींद्र खरात आणि बाळा सोनवणे यांच्यात वाद झाला. 25 फेब्रुवारीला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोन गटांत जुंपली होती. त्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. दोन गटांत झालेल्या दगडफेकीत कार, मोटर सायकलीचे मोठे नुकसान झाले होते.

'मीच अध्यक्ष'

बाळा सोनवणे आणि नगरसेवक रवींद्र खरात यांच्यात 'मीच अध्यक्ष' यावरून वाद झाला होता. वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगड आणि काचेच्या बाटल्या भिरकावण्यात आल्या होत्या. याचवेळी पिस्तूलमधून फायरिंग केल्याची माहितीही समोर आली आहे.

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...