ठाणे, 10 फेब्रुवारी : बिल्डराला 3 कोटींची खंडणी प्रकरणी अखेर ठाणे महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक नारायण पवार याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण पवार हे फरार होता. शेवटी आज त्यांना अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आलंय.
एका विकासकाकडून ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अटकपूर्व जामिनाच्या जोरावर नारायण पवार यांना अटक होत नव्हती. गेल्या आठवड्यात नारायण पवार यांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणी नंतर सर्वोच्च न्यायालयाने नारायण पवार यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आज नारायण पवार यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता नारायण पवार यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुरज परमार या विकासकाच्या आत्महत्येमुळे ठाणे मनपातील नगरसेवक, अधिकारी, विकासक आणि सामाजिक कार्यकर्ते यांची कशी अभद्र युती जगासमोर आली होती. त्यात सुरज परमार यांनी आत्महत्या केल्यानंतर ठाणे मनपाच्या अनेक दिग्गज नगरसेवकांची नावे समोर आली होती. नारायण पवार यांनी ३ कोटी रुपयांची खंडणी का मागितली होती? त्यात आणखी कोणा कोणाचा सहभाग होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे ठाणे पोलीस लवकरच उघड करणार असल्याने ठाणे मनपातील अनेक अधिकारी आणि नगरसेवकांचे धाब दणाणले आहे.
शिवसेनेच्या नेत्यावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार, 1 जणाचा मृत्यू
दरम्यान, गुरदासपूरमध्ये शिवसेनेच्या उत्तर भारतातील प्रमुख हनी महाजन यांच्यावर अज्ञात हल्लखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हनी महाजन यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते थो़डक्यात बचावले आहे. तर त्याच्या शेजारी असलेल्या किराणा मर्चेंट अशोक कुमार यांचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी हनी महाजन हे डडवां रोडवरील आपल्या दुकानात बसलेले होते. संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन गोळीबार केला.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केले. या गोळीबारात हनी महाजन थोडक्यात बचावले. परंतु, त्यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले. परंतु, त्यांच्या शेजारीच उभा असलेले अशोक कुमार यांच्या डोक्यात गोळी लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले.
स्थानिकांनी महाजन आणि अशोक कुमारला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परुंतु, अशोक कुमार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हनी महाजन गंभीर जखमी असून त्यांना अमृतसर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Bjp corporator, Crime, Mumbai police, Thane, Thane police