भाजप नगरसेविकेचा रुद्रावतार, आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात घुसून केली तोडफोड

भाजप नगरसेविकेचा रुद्रावतार, आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात घुसून केली तोडफोड

नगरसेविकेच्या विरोधात सोशल मीडियावर टाकल्या होत्या पोस्ट....

  • Share this:

हैदर शेख, (प्रतिनिधी)

चंद्रपूर, 21 नोव्हेंबर: चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटचा परिसरात शनिवारी भाजप नगरसेविकेच्या रुद्रावतार पाहायला मिळाला. शहरातील वादग्रस्त आरटीआय कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरात घुसून भाजपच्या नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी तोडफोड केली.

सोशल मीडियावर सततच्या बदनामीला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी सांगितलं. तर छबुताई वैरागडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे. याप्रकरणी बेले यांनी नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

हेही वाचा...कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..

चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय तक्रारींच्या निमित्ताने कायम वादात राहणारे राजेश बेले यांच्या घरी जावून भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी गोंधळ घालत तोडफोड केली. भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी आपल्या कुटुंबासह बेले यांचे घर गाठत तोडफोड करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे जटपुरा गेट परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

गेले काही दिवस आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्याविरोधात अनाधिकृत बांधकाम केल्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. त्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू होता. त्याचं पर्यवसन शनिवारी थेट हल्ला व तोडफोडीत झालं. दरम्यान सततची बदनामी व अधिकाऱ्यांकडे होत असलेली वेगवेगळ्या कामांची नाहक तक्रार यामुळेच संतापून जात आपण हे पाऊल उचलल्याचे नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी म्हटलं आहे. आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी याच प्रकारातून आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची बाबही वैरागडे यांनी बोलून दाखविली.

दुसरीकडे, भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी आपण स्वतः कोरोना काळात विलगीकरणात असताना मुद्दाम घराचे बांधकाम तोडत नाहक वाद उकरून काढल्याचे राजेश बेले यांनी सांगितलं आहे. तर विविध अनाधिकृत व बेकायदा प्रकरणात आपण आवाज उचलल्याने वैरागडे यांनी संतप्त होत आपल्यावर कुटुंबियांसह चाकू हल्ला केला, असा आरोप देखील बेले यांनी केला आहे. दरम्यान दोन्ही पक्षांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत परस्परांविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत.

हेही वाचा..Drugs प्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला अटक, पतीचीही कसून चौकशी

दरम्यान, गेले काही महिने चंद्रपुरात आरटीआय व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकरणांमध्ये सातत्याने विरोधी भूमिका घेतल्याने संघर्षाची स्थिती उद्भवली आहे. आता रामनगर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 21, 2020, 7:57 PM IST

ताज्या बातम्या