'डॅमेज कंट्रोल'साठी भाजपने बोलावली महत्त्वाची बैठक, फूट रोखणार?

'डॅमेज कंट्रोल'साठी भाजपने बोलावली महत्त्वाची बैठक, फूट रोखणार?

आरोपांच्या पार्श्वभूमीवर खडसे आज पुन्हा आयत्यावेळी प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत.

  • Share this:

जळगाव, 7 डिसेंबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाची उत्तर महाराष्ट्रासाठी कोअर कमिटीची बैठक होत आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांतील वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्यानं,आज या बैठकीत काय होतंय, याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि कोअर कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत. पक्ष संघटन, पक्षांतर आणि गत निवडणुका हे विषय असले तरी रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यात आल्याच्या एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खडसे आज पुन्हा आयत्यावेळी प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत.

जळगाव शहरातील बालांनी लॉन येथे आज दुपारी साडे बारा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय काय घडते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. डॅमेज कंट्रोल करण्यात भाजप यशस्वी होतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते थेट माध्यमांसमोर येत फडणवीसांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 7, 2019, 12:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading