मुंबई, 26 फेब्रुवारी : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या वतीने चित्रा वाघ (Chitra Wagh) या महिला नेत्या सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. मात्र याच चित्रा वाघ यांच्याबाबत आता सोशल मीडियावर गलिच्छ प्रकार घडला आहे.
चित्रा वाघ यांची ऑनलाईन बदनामी सुरू करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या पतीसोबतचा फोटो मॉर्फ करत त्याऐवजी संजय राठोड यांचा फोटो वापरुन तो पसरवला जात आहे. हा फोटो अनेक सोशल माध्यमांत व्हायरल केला गेला असून त्यामुळे चित्रा वाघ यांना नाहक त्रास होत आहे.
याच प्रकरणावरून चित्रा वाघ यांना याआधी शिवीगाळ करणारे, धमक्या देणारे फोन आले होते. त्यानंतर आता असे फोटो पसरवून त्यांची बदनामीही केली जाऊ लागली आहे. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी समोर येत आहे.
चित्रा वाघ आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण :
पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूनंतर तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं आणि सुरुवातीला या प्रकरणाची विशेष चर्चा झाली नाही. मात्र त्यानंतर काही दिवसांत पूजा चव्हाण आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्यातील फोनवरील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि हे प्रकरण चर्चिलं जाऊ लागलं.
एकीकडे, या प्रकरणी विविध फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होत होत्या, मात्र कोणावरही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ या आक्रमक झाल्या आणि त्यांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही वाघ यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याप्रकरणी आगामी काळात आणखी काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.