'प्रत्येक कुटुंबाला 5 हजार रुपये द्यायला सुरुवात', चंद्रकांत पाटलांकडून पूरग्रस्तांसाठी अनेक मोठ्या घोषणा

ज्यांची घरे पडली आहेत त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत साडेतीन लाख रुपये देण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 12:18 PM IST

'प्रत्येक कुटुंबाला 5 हजार रुपये द्यायला सुरुवात', चंद्रकांत पाटलांकडून पूरग्रस्तांसाठी अनेक मोठ्या घोषणा

कोल्हापूर, 16 ऑगस्ट : पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे जी मदत मागितली आहे, त्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला 5000 द्यायला सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत साडेतीन लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांना मागील आठवड्यात पुराचा मोठा फटका बसला. या भागातील पुराचं पाणी आता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. असं असलं तरीही पुरामध्ये अनेकांची घरं पडली आहेत. तसंच पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व परिस्थितीबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती देत पूरग्रस्तांना मदतीची घोषणा केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

'कोल्हापूर सांगली परिसरातील जनजीवन आता सुरळीत होत आहे. या भागातल्या तब्बल चार लाख 13 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आलं होतं. मात्र ती लोक आता आपापल्या घरी परतत आहेत. अशावेळी त्यांची घरे, गाव स्वच्छ करण्याचं मोठ आव्हान आहे. सांगली जिल्ह्यातला पाणीपुरवठा सुरळीत झाला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातला अजूनही सुरळीत झाला नाही. सरकारी योजनांची नीट अंमलबजावणी करणार असून राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे,' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्तांना दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडूनही माहिती

Loading...

'आतापर्यंत जिल्ह्यातील 18 हजार 57 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार अशी 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलं आहे,' अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे. 'पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. यात ग्रामीण भागातील 15 हजार 565 आणि शहरी भागातील 2 हजार 492 अशा एकूण 18 हजार 57 कुटुंबांना 9 कोटी 1 लाख 80 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरू आहे,' असंही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटलं आहे.

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...