सांगली, 16 नोव्हेंबर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. भाजपसोबत असलेले सदाभाऊ खोत काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे.
सांगलीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात भाजपा पदाधिकारी व रयत क्रांती संघटना पदाधिकारीही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर सदाभाऊ यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं आहे. रयत क्रांती संघटना आणि सदाभाऊ खोत यांचा सन्मान करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
सदाभाऊ उमेदवार मागे घेणार
सदाभाऊ खोत यांच्या संघटनेनं विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत आपला उमेदवार उतरवल्याने त्यांचा भाजपसोबत संघर्ष निर्माण झाला होता. मात्र आता सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात भाजपाला यश आलं असून पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटना आपला उमेदवार उद्या मागे घेणार आहे. याबाबत बैठकीमध्ये निर्णय झाला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
खोत विरुद्ध शेट्टी सामना
सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीपासून दूर होण्याचं आवाहन केल्यानंतर या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. 'ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही,' असं म्हणत राजू शेट्टी यांनी टीका केली होती. या टीकेला खोत यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. 'माझ्या बरोबर होते तेव्हा राजू शेट्टी हे काशीला जाऊन हात धुवून येत होते का? की आता रोज गोमूत्राने हात धुवत आहेत,' असं सदाभाऊ खोत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.