नाशिक, 10 डिसेंबर: महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा कंबर कसली आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेत जाऊन मनगटावर शिवबंधन बांधलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पुन्हा पक्षात बोलवण्यासाठी भाजपनं गळ टाकला आहे. मात्र, भाजपच्या गळाला बाळासाहेब सानप पुन्हा लागतात का, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांच्या सारख्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली आहे. आता बाळासाहेब सानप भाजपची साथ देतात का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा...केंद्रीय मंत्र्याचा पाहा 'तो' VIDEO, रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. 2014 मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता. माजी आमदार बाळासाहेब सानप हे 2014 मध्ये नाशिक-पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी भाजपनं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही.
यामुळे कापलं तिकिट...
दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी एका मोठा खुलासा केला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पवन पवार याच्यामुळेच आपण निवडून आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे सानप यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे भाजपनं त्यांचं तिकिट कापलं होतं, असंही बोललं जात आहे.
नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पराभव सामना करावा लागला. सानप यांनी पराभवानंतर राष्ट्रवादीलाही रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. बाळासाहेब सानप यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतलं होतं. विशेष म्हणजे बाळासाहेब सानप यांनी एका महिन्याच्या कालावधीत तीन पक्षांचा प्रवास केला होता.
हेही वाचा...VIDEO : शेतकरी आंदोलन पेटलंय; उत्तर प्रदेश सीमेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी राज्यातील आगामी निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे एकटा पडलेला पक्ष भाजपने देखील महाविकास आघाडीविरुद्ध कंबर कसली आहे.