महाविकास आघाडी तुटली, शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत बसला भाजपचा महापौर

महाविकास आघाडी तुटली, शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत बसला भाजपचा महापौर

युतीमध्ये असलेल्या शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला आणि तीन वेगळ्या विचारांच्या अशा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घरोबा केला. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांत आणि ग्रामीण भागात पाहायला मिळाला.

  • Share this:

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव, 27 जानेवारी : विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक सत्तापालट उभ्या महाराष्ट्राने पाहिला. युतीमध्ये असलेल्या शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला आणि तीन वेगळ्या विचारांच्या अशा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घरोबा केला. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांत आणि ग्रामीण भागात पाहायला मिळाला. पण असं असलं तरी जळगावमध्ये शिवसेना भाजप एकत्र पाहायला मिळाली.

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडीत भाजपाच्या भारती कैलास सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती. त्यांनी 24 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

शिवसेनेनेही भाजपला समर्थन दिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली होती, केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. आज सोमवारी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निवडीची घोषणा केली. निवडीची घोषणा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली.

भारती सोनवणे या उपमहापौर राहिलेल्या आहेत. त्या भाजप नेते स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून कैलास सोनवणे यांची ओळख आहे.

इतर बातम्या - लय भारी मुंबईकर! आफ्रिकेत 5895 मी. उंच शिखरावर फडकवला भारताचा 71 फूट तिरंगा

दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली होती. भाजपने महाविकास आघाडीला सुरुंग लावत जिल्हा परिषदेत 'कमळ' फुलवलं. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले.

या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी भाजपची फत्ते होऊन अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता.

इतर बातम्या - मला हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद करा, राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी

First published: January 27, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या