मुंबई, 20 मार्च, विजय वंजारा : दहिसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅनरवरून झालेल्या वादात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विभीषण वारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारे यांच्या पाठीला, खांद्याला आणि छातीला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
प्रकाश सुर्वेंसोबत काम
विभीषण वारे हे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत गेल्या 26 वर्षांपासून काम करत होते. मात्र त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आपण भाजपमध्ये प्रवेश केला याच रागातून सुडाच्या भावनेनं हा हल्ल्या झाल्याची प्रतिक्रिया या हल्ल्यात जखमी झालेल्या वारे यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#मुंबई : शिवसेनेने भाजप पदाधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी pic.twitter.com/aXsJlwAovY
— News18Lokmat (@News18lokmat) March 20, 2023
दोन जणांना अटक
सुनील मांडवे, आशिष नायर, नितेश उतेकर, सोनू पालांडे, मयूर वाघेला, समीर कोटी, अनिल दबडे अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावं आहेत. त्यापैकी अनिल दबडे आणि सुनील मांडवे यांना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू असून, तपासासाठी पाच पोलीस पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. हा हल्ला राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.