'या' रुग्णालयात मायलेकींचं असं केलं जातंय स्वागत, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

'या' रुग्णालयात मायलेकींचं असं केलं जातंय स्वागत, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

दर बुधवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सामाजिक संस्थांकडून देखील पुढाकार घेतला जातोय.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलाडाणा, 15 जानेवारी :  मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता शासनाकडून या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर स्त्रीजन्माचे स्वागत करत कन्या रत्नाचा जन्म दिलेल्या माता आणि तिच्या लेकीचा साडी चोळी आणि झबला टोपी देऊन  जिल्ह्यातील खामगाव सामान्य रुग्णालयाकडून सन्मान करण्यात आला. या विधायक उपक्रमाने या शासनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचार्यांकडून स्त्री जन्माचा टक्का वाढवण्याच्या हेतूने मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा आणि त्या मुलीचा साडीचोळी, झबला टोपी आणि सकस आहाराचे वाण देण्याच्या कार्यक्रम आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. अशा मायलेकींचा दर आठवड्याला सन्मान होणार असून या उपक्रमाची सुरुवात परिचरिकांनी स्वयंस्फूर्तीने केली आहे.  दर बुधवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सामाजिक संस्थांकडून देखील पुढाकार घेतला जातोय. सामान्य रुग्णालयाकडून महिला प्रसूती कक्षात महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी महान स्त्रियांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. खामगाव सामान्‍य  रुग्‍णालयात या अभिनव उपक्रमाचे उद्‌घाटन नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. निलेश टापरे, डॉ. सुलेखा मेंढे यांच्‍यासह मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

स्‍त्री जन्‍मदरात  जिल्‍ह्यात रेडझोनमध्ये असल्‍याने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या उपक्रमाअंतर्गत आजपासून दर बुधवारी सामान्‍य रुग्‍णालयात कन्‍या जन्‍माचे स्‍वागत या पद्धतीने केले जाईल अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी याप्रसंगी दिली.  सामान्‍य रुग्‍णालयाचा हा उपक्रम प्रशंसनिय असून सामाजिक संस्‍थांनी या उपक्रमात सहभाग घ्यावं असं आवाहन करत  या उपक्रमासाठी आपण सहकार्य करणार असल्‍याचे नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी सांगितलं. त्‍यानंतर सर्व मातांना साडी, चोळी झबला आणि सकस आहाराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी सामान्‍य रुग्‍णालयातील परिचारीका सुमित्रा राऊत गवळी, कमल पद्मने, सरला झोडपे, माया वानखडे, रेखा खडबडे, बाली वासनकर, मिरा घाटे, माधुरी मोरे, अर्चना नारे, श्रध्दा मोहनकर यांनी पुढाकार घेतला.

प्रसुती रुग्‍ण कक्षात थोर महिलांच्‍या प्रतिमा

समाजाच्‍या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्‍या थोर क्रांतीकारी महिलांच्‍या प्रतिमा सामान्‍य रुग्‍णालयातील प्रसुती कक्षात लावण्यात आल्‍या आहेत. त्‍यामध्ये राजमाता जिजाऊ, क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले, आद्यमहिला पत्रकार तानुबाई बिर्जे, झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्‍यासह विविध कार्यक्षेत्रात नावलौकिक केलेल्‍या महिलांच्‍या प्रतिमा प्रेरणादायी ठरतील आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश जाईल असा या मागचा हेतू आहे.

स्‍त्रीभ्रुण हत्‍येला आळा बसावा तसंच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा उपक्रम आणखी प्रभावीपणे समाजात पोहचला पाहिजे. या करिता मकर संक्रांतीपासून कन्‍या जन्‍माचे

स्‍वागत करण्याचा उपक्रम परिचारीकांच्‍या पुढाकारातून राबविल्‍या जात आहे. आज या उपक्रमाला सुरुवात झाली. समाजसेवी संघटनांना या उपक्रमात सहभागी व्‍हायचे असल्‍यास त्‍यांचे सुद्धा स्‍वागत आहे.

Published by: sachin Salve
First published: January 15, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading