महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, राज्यपालांनी भाजपला केलं सत्तास्थापनेसाठी पाचारण

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, राज्यपालांनी भाजपला केलं सत्तास्थापनेसाठी पाचारण

महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

अभिषेक पांडे मुंबई, 9 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत भाजपला पुरेसं संख्याबळ म्हणजे 145 चा आकडा सिद्ध करावं लागेल.

राज्यातील 2014 च्या विधानसभेचा कार्यकाळ शुक्रवारी संपला. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडेच कार्यभार आहे.  कोणत्याही राजकीय पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नसल्याने भाजपला निमंत्रित करण्यात आलं आहे.  यानंतर नव्या सरकारला बहुमत देण्यासाठी  30 दिवसांचा वेळ दिला जाऊ शकतो.

भाजपला विधानसभेत 105 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आमच्याकडे 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे 123 आमदार पाठिशी असले तरी आणखी किमान 22 आमदारांचं संख्याबळ भाजपला मिळवावं लागेल. तरच ते विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकतील. भाजपच्या कोअर कमिटीची यासंदर्भात उद्या बैठक होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेलं भाष्य आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर यामुळे युतीचे संबंध आणखी ताणले गेले. आमच्याकडे दुसरे पर्याय खुले आहेत, असं शिवसेना नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

युतीचं भविष्य काय असेल असं विचाल्यावर युतीच्या नेत्यांना वडिलकीच्या नात्याने सल्लाही त्यांनी दिला. "एक वडील म्हणून माझा सल्ला आहे. कुणी कुणाला खोटं ठरवू नये. 30 वर्षं ते एकमेकांबरोबर आहेत."

"सेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार आम्ही अद्याप केलेला नाही. आम्ही अजून याची चर्चाही केलेली नाही. राज्यपाल काय करतात ते आम्ही बघतो. लवकरात लवकर स्थिर सरकार राज्यात येणं आवश्यक आहे."

(ही बातमी अपडेट होत आहे.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 07:42 PM IST

ताज्या बातम्या