मुंबई, 29 जून: कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत टप्याटप्याने शिथिलता दिली जाणार आहे. 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरू राहतील. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात.
हेही वाचा...TikTok स्टारची गळा आवळून हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये अशा अवस्थेत सापडला मृतदेह
मुंबईत तसेच राज्यात आता मुखावरण अर्थात मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. 1 जुलै महिन्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आता रस्त्यांवरही पोलिसांनी नाकाबंदी वाढवली आहे.
दूसरीकडे बीएमसीनेही नागरिकांसाठी मास्क बंधनकारक करून एक प्रकारे त्यांचीही नाकाबंदी केली आहे. कोविड 19 संसर्गासाठी लागू असलेली टाळेबंदी टप्प्या टप्प्याने शिथिल करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नागरिकांकडून कोविड-19 संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मास्कचा वापर व्यवस्थित केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळं, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करुन पुनश्च हरिओम अर्थात मिशन बिगीन अगेनची घोषणा केली आहे. केंद्र व राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणताना देण्यात येत असलेल्या सवलतींची अंमलबजावणी करताना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारलेली नाही.
नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढू शकतो, असे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र तरीही काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक व इतरांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीनिशी सोमवारी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
हेही वाचा..आजही COVID-19 रुग्णांची धोकादायक वाढ, चौथ्या दिवशीही 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण
निर्देशांनुसार, कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus, Coronavirus, Coronavirus india