पंढरपूर, 28 मार्च : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly constituency by-election Date) 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली असून दामाजी सहकारी साखर करखान्याचे चेअरमन व आवताडे समुहाचे सर्वेसर्वा समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
सोशल मीडियावरून समाधान अवताडे यांनी भाजप नेत्यांचे उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले. आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
हेही वाचा - शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीबाबत अमित शहांची सूचक प्रतिक्रिया
राष्ट्रवादीकडून कोण उतरणार मैदानात?
राष्ट्रवादीने (NCP) अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नसल्याने पंढरपूरची निवडणूक चुरशीची होत चालली आहे. या निवडणुकीसाठी 30 मार्च ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर 31 मार्च नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. त्यामुळे पुढील काही दिवसांतच राष्ट्रवादी आपला उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
या पोटनिवडणुकीत संभाव्य उमेदवारांमध्ये काही दिवसांपासून युटोपीय साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, डी.व्ही.पी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे नाव मागील काळापासून उमेदवारीसाठी चर्चेत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Pandharpur, Pandharpur news