कोल्हापूर, 11 जून : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी तसा प्रस्ताव दिला आहे. राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेवर जावं, अशी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांनी भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर त्यांचे भाजपाशी संबंध बिघडले. त्यांनी मोदी-भाजपावर टीकेचा प्रहार सुरू केला. तेव्हापासून ते काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकले होते. लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आले.
लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह महाविकास आघाडीकडे धरला होता.
राष्ट्रवादीच्या ऑफरवर काय आहे शेट्टींची भूमिका?
थेट शरद पवार यांनी राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेवर जावं, याबाबत आग्रह केला असल्याने आता राजू शेट्टी त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीच्या ऑफरबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेऊ, असे राजू शेट्टी यांनी म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राजू शेट्टी हे लगेच आपले पत्ते खुले करणार नसल्याचं दिसत आहे.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी यांच्यात चांगलीच चुरस रंगली आहे. विधानपरिषद उमेदवारी मिळावी म्हणून अनेक महिला पदाधिकारी इच्छुक आहे. राज्यपाल नियुक्त 10 जागा रिक्त झाल्या आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी एक जागा महिला प्रतिनिधींना मिळेल हे निश्चित मानलं जातं आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहेत.
विद्यमान विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण या दोन वेळा परिषदेवर आहेत. अभ्यासू आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गटाच्या मान्यल्या जातात. तर रुपाली चाकणकर यांची पुणे महिला जिल्हाध्यक्ष पदावरून थेट महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष निवड झाली. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.