पिंपरी चिंचवड, 25 जून : अनलॉक-1 ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वच शहरांमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. यामुळे नागरिकांना बाहेर पडणं शक्य होत आहे. मात्र त्याचवेळी आता पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वारंवार सांगूनही बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सम विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याने आता अखेर पुढील 3 दिवसांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी आणि सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यानं नागरिक आणि व्यापारी नियमांचं पालन करणार नसतील तर याही पेक्षा अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं सांगत सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं अहवान आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलं आहे. या एका बाजार पेठेतील एका दिवसाची उलाढाल कोट्यावधींची आहे. मात्र बेशिस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांमुळे आता अर्थव्यस्थेला फटका बसणार आहे. तसंच कोरोनाचा धोकाही वाढला आहे.
कोणत्या भागात वाढत आहेत रुग्ण?
साई चौक, बौद्ध नगर, भाटनगर, रमाबाई नगर, आंबेडकर नगर, नानेकर चाळ, वैष्णव देवी मंदिर परिसर आदी भागात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प व परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे झगडे यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, 2 दिवसांपूर्वीही मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत, असं कारण देऊन बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यापासून महापालिका प्रशासनाकडून तिसऱ्यांदा बाजारपेठ बंद केली जात आहे.
एकीकडे, शहरात कोरोनाचं संकट वाढत असताना पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात महापालिका उभारत असलेल्या आयसोलेशन वॉर्डला विरोध करत स्थानिक नागरिकांनी काम बंद पाडल्याची माहिती काही समोर आली होती. या प्रकाराबाबत माहिती मिळताच महापालिकेतील अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.