कल्याण, 10 ऑक्टोबर : बकरी पालनाच्या व्यवसायात पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकातील पोलिसांनी अटक केली आहे. तर या टोळीचा म्होरक्या अद्यापही फरार आहे.
कल्याण पश्चिमेतील भानुसागर टॉकीज जवळ हीना अपार्टमेंटमध्ये अनमोल साई ॲग्रो गोट नावाची एजेन्सी होती. कमलकांत यादव व त्याचे साथीदार माधुरी देशमुख, राजेश गुप्ता, पवन दुबे हे चौघे बकरी पालनाचा व्यवसाय करत होते. मुरबाड येथे गोट फार्म असून त्यामध्ये 50 बकऱ्या असल्याबाबत लोकांना या स्कीममध्ये पैसे गुंतवणूक केल्यास एका वर्षात दुप्पट रक्कम करून देतो असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून चेकने तसेच ऑनलाईन व रोखीने पैसे स्वीकारत होते. आतापर्यंत यांनी अनेक लोकांकडून जवळपास 40 लाख रुपये घेतले आहेत. काही लोकांना पैसे मिळाले नाही. याचवेळी कंपनीचा मालक कमलाकांत यादव पळून गेला. म्हणून लोकांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांनी तपास सुरू करत लोकांना गंडा घालणाऱ्या घाटकोपर येथील पवन दुबे याला हैद्राबाद येथील हयात नगर येथून तर राजेश गुप्ता याला ओटी सेक्शन उल्हासनगर येथून अटक केली आहे. तर त्यांचा म्होरक्या कमलेश यादव आणि साथीदार माधुरी देशमुख हे अद्याप फरार आहेत.
अटकेत असलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 6 लाख 40 हजार 800 रुपये रोख रक्कम, एक लॅपटॉप, पॅनॉसॉनिक कंपनीचा ए सी युनिट, एक लाकडी टेबल, 4 खुर्च्या असा एकूण 7 लाख 800 रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी वपोनि नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. (गुन्हे) संभाजी जाधव, सपोनि देविदास ढोले, पो.ना. एस. एच. भालेराव, पो.ना एन.डी.दळवी, पो.शि. के.एन. सोंगाळ यांनी केली आहे.