डोंबिवली, 3 ऑगस्ट : डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटांचं सत्र अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आज डोंबिवली एमआयडीसीतल्या अंबर केमिकल कंपनीत मोठा स्फोट (blast in dombivli midc) झाला.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये अंबर कंपनी आहे. या कंपनीत आज संध्याकाळी सव्वापाचच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आजूबाजूचा संपूर्ण परुसर हादरून गेला. या स्फोटामुळे अंबर कंपनीसह आजूबाजूच्या दोन कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं. सुदैवाने आज या कंपनीला सुट्टी असल्यामुळे कुणालाही इजा झालेली नाही.
या स्फोटाचा हादरा आणि त्यानंतर पसरलेल्या केमिकलच्या वासामुळे या भागातल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. याच कंपनीच्या बाजूला असलेला रस्ता काही महिन्यांपूर्वी प्रदूषणामुळे गुलाबी झाला होता. तर याच परिसरातल्या मेट्रोपोलिटन कंपनीलाही फेब्रुवारी महिन्यात भीषण आग लागली होती.
दरम्यान, आज पुन्हा झालेल्या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतल्या या जीवघेण्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून पुन्हा एकदा रान पेटण्याची शक्यता आहे.