मुंबई, 5 मे : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या मोठ्या राजकीय अस्थिरतेच्या चर्चेनंतर राज्यातील विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली. या निवडणुकीचं वेळापत्र जाहीर झाल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी काही नावांवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या नावावर चर्चा झाली. तर शिवसेनेकडून या आधीच दोन नावं निश्चित झाली आहे. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नुकताच ज्यांच्या आमदारकीचा कार्यकाल संपला त्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांच्या नावाचा समावेश आहे.
निवडणूक उमेदवारी म्हटलं की जागा आणि उमेदवारीसाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होते. राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून दोन जागा तर काँग्रेस 1 जागा घेणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत?
राष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या इच्छुकांची नाव चर्चेत आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून मोहन जोशी, माणिकराव ठाकरे , नसिम खान, मुजप्फर हुसेन यांची नाव चर्चेत आहेत.
राष्ट्रवादीत सु्प्रिया सुळे या त्यांच्या निकटवर्तीय रूपाली चाकणकर, आदिती नलावडे यांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील तर अजित पवार हे अमोल मिटकरी, नजीम मुल्ला यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्ली हायकमांड यांच्याशी काँग्रेस पक्षातील अंतिम नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा करणार आहेत, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
हेही वाचा - कोरोनाच्या संकटकाळात 'ठाकरे सरकार' देणार महाराष्ट्राला खुशखबर?
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात केवळ एक जागा पडत असल्याने इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यात एकाच उमेदवाराला संधी देताना प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असं समजतं. काँग्रेस प्रदेशध्यक्ष थोरात हे दिल्लीत महाराष्ट्र प्रभारी मललिकार्जुन खरगे, अहमद पटेल आणि सोनिया गांधी यांचियाषी चर्चा करून अंतिम नावं निश्चित करतील, अशी माहिती आहे.
संपादन - अक्षय शितोळे