भिंवडी, 18 जुलै : भिवंडी शहरालगत नदिनाका येथील कामवारी नदी पुलावरून नागरिकांचा ओरडण्याचा आवाज येत होता. नदीच्या प्रवाहात लहान मुलगी वाहून जात असताना सर्वच हतबलतेने पाहात होते. मात्र एका जिगरबाज तरुणाने नदी प्रवाहात उडी मारून मुलीचे प्राण वाचवले. त्यामुळे या जिगरबाज तरुणाचं आता सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
लहान मुलगी पुलाखालून नदीच्या पुराच्या प्रवाहासोबत वाहून जात असल्याचं पाहिल्यानंतर तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्याच क्षणी नदीच्या डाव्या काठाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लीम बहुल वस्तीतून एक देवदूत वाऱ्याच्या वेगाने पळत आला आणि जीवाची कुठलीही तमा न बाळगता पाण्यात सूर मारला.
अरबाज असं या युवकाचं नाव आहे. अरबाजने विद्युत वेगाने पाण्याचा प्रवाह कापत वाहत जाणाऱ्या त्या लहान मुलीला वाचवलं. अरबाजसोबत इतरही चार-पाच युवकांनी पाण्यात भराभर उड्या मारल्या होत्या. ते सर्वजन मुलीला घेवून काठावर आले. मुलीचा बाप धाय मोकलून काठावर रडत होता. मुलीच्या तोंडात पाणी गेल्याने तातडीने दवाखान्यात रवाना करण्यात आले.
एका मुलीला मृत्यूच्या दारातून परत घेऊन आल्यानंतर तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. पण कुठलाही अंहकार आणि खूप मोठे काम केल्याचा आव त्याने आणला नाही. मुलीचा जीव वाचल्यानंतर तिच्या वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्वांकडून जोरदार टाळ्या वाजवून अरबाज या तरुणाच्या कौतुकास्पद कामगिरीची प्रशंसा करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.