पावसाच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पोहायला गेला, 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

पावसाच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पोहायला गेला, 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

थोडी जरी नजरचूक झाली तर काय होऊ शकतं, हे दाखवणारी दुर्दैवी घटना मुंबईजवळील भिवंडी शहरात घडली आहे.

  • Share this:

भिवंडी, 7 जुलै : पावसाळा हा लहान मुलांचा आवडात ऋतू. चिंब भिजून पावसाचा आनंद लुटण्यासाठी किंवा त्यानंतर पाण्यात पोहोण्यासाठी मुलं उत्सुक असतात. मात्र अशावेळी या चिमुकल्यांची घरातील वडीलधाऱ्यांनी जरा जास्त काळजी घेणं आवश्यक असतं. याबाबत थोडी जरी नजरचूक झाली तर काय होऊ शकतं, हे दाखवणारी दुर्दैवी घटना मुंबईजवळील भिवंडी शहरात घडली आहे.

भिवंडीत गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम असताना सखल भागात पाणी साचले आहे. अशातच अशोकनगर इथं बिल्डरने कंपाऊंड केलेल्या जागेतील खड्ड्यात पाणी साचले असताना घुंघटनगर येथील दोन मुले पोहण्यासाठी या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने  सुमित गुप्ता या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत माहिती मिळताच  अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन सुमितचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. तर संतप्त नागरिकांनी बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कामवारी नदीला पूर आला आहे. नदीनाका इथं भिवंडी - वाडा  रोडवरील याच नदीवर पूल बांधण्यासाठी एमएमआरडीए आणि पीडब्लूडी यांच्या दुर्लक्षामुळे डबर नदीच्या पात्रात टाकल्याने असाच मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास या परिसरातील म्हाडा कॉलनी,  शेलार, मीठपाडा परिसरातील घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 7, 2020, 11:04 AM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या