भिवंडी, 13 जुलै : भिवंडीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा (Coronavirus) वाढता धोका पाहता कोव्हिड -19 रुग्णालयात डॉक्टरसह स्टाफने मास्कसह पीपीई किट घालणे बंधनकारक आहे. मात्र असं असताना भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असताना त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेत नेताना तेथील डॉक्टरने पीपीई किट आणि मास्क सुद्धा न लावता रुग्णवाहिकेपर्यंत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोव्हीड - 19 रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कोरोनाचा धोका वाढत असताना डॉक्टरच असे बेजाबदार पद्धतीने वागत आसल्याचे समोर येत आहे. डॉक्टरच्या संपर्कात अनेक लोक येत असतात. मात्र डॉक्टरच काळजी घेत नसल्याने इतर अनेकांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, भिवंडी ग्रामीण आणि शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर महापालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनीही सायंकाळी 19 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे भिवंडीतील नागरिक प्रशासनाला किती साथ देतात ते पाहावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.