भिवंडी, 16 जानेवारी : भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. एक दोन ठिकाणच्या घटना वगळता या निवडणुका शांततेत पार पडल्या. मात्र असं असलं तरीही या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील भिनार ग्रामपंचायतीमध्ये समोर आला आहे.
एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यशासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवीण्यासाठी चक्क जादूटोणा होत असल्याची घटना भिवंडीतील भिनार गावात समोर आली आहे . भिनार गावात ग्राम पंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मधून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत जय बजरंग पॅनल भीमराव कांबळे , करून भोईर ,व लक्ष्मी भोईर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र या उमेदवारांना हरविण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी चक्क त्यांच्या प्रचार पत्रकात अर्ध लिंबू कापून , हळद कुंकू व तांदूळ असा उतारा करून गावातील तलावाच्या बाजूला असलेल्या बोरीच्या झाडाखाली फेकून दिला होता.
शनिवारी गावातील एक व्यक्ती बोरं खाण्यासाठी या झाडाजवळ गेला असता सदर प्रकार त्याला दिसल्याने त्यांनी गावातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिन्ही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी धाव घेत एकच गर्दी केली.
दरम्यान, 'मांत्रिकांच्या साहाय्याने केलेला सदरचा करणी व जादूटोण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहोत. प्रतिस्पर्धी उमेदवार अशा प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी खालच्या पातळीवर जातील अशी आम्हाला अपेक्षा नव्हती,' अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. तर अशा प्रकारच्या जादूटोण्याने निवडणूक जिंकता येत नसून गावात विकास कामे करूनच निवडणूक जिंकता येतात हे विरोधकांना माहीत नसेल म्हणूनच त्यांनी असा घृणास्पद प्रकार केला आहे. या बाबत आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया येथील काही नागरिकांनी दिली
आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Gram panchayat