भिवंडी, 8 नोव्हेंबर : भिवंडी शहरातील देह व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडी येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी आता नवं पाऊल उचललं आहे. या महिलांनी श्री साई सेवा संस्थेच्या माध्यमातून टाकाऊ कचऱ्यापासून विविध दिवे ,लॅम्प ,शोभिवंत आभूषणे सुरू करण्याचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला आहे.
या परिसरातील इको लाईट स्टुडिओ या महिला सक्षमीकरण केंद्राचे उदघाटन ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या शुभहस्ते महिला सक्षमीकरण केंद्राच्या श्रीमती खाडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कांबळे ,संस्थेच्या संस्थापिका डॉ स्वाती सिंग खान,कचऱ्या पासून शोभिवंत वस्तू निर्मितीचा ध्यास घेतलेले डॉ बिपीन देसाई दाम्पत्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात नवी पहाट
महिला या जन्मापासून वेदना सहन करीत असतात... मग त्या उच्च पदस्थ अधिकारी असल्या तरी त्यांना महिला म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागते. अशा परिस्थितीत श्री साई सेवा संस्थेने देह व्यापार करणाऱ्या महिलांसाठी काम करूनच न थांबता या महिलांना त्या नरक यातना सहन कराव्या लागणाऱ्या व्यवस्थेतून बाहेर काढून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. या महिलांना स्वावलंबी बनवून समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करून देण्याचे कार्य उभे केले आहे. हे कार्य कौतुकास पात्र असून अशा कार्यासाठी शासकीय पातळीवर जी काही मदत करणे शक्य असेल ती मदती देण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी दिले .
हनुमान टेकडी येथील महिलांना वापरून फेकून दिलेल्या कॉफी भुकटी पासून विविध आकाराचे आभूषणे व आकर्षक दिवे बनविण्याचे प्रशिक्षण डॉ बिपीन देसाई या दाम्पत्यांनी दिले असून येथे सध्या प्राथमिक स्तरावर महिलांकडून रंगरंगोटी व सजावट केली जात आहे. हे उत्पादन लवकरच विविध संस्थांच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका डॉ स्वाती सिंग खान यांनी दिली आहे.