रवी शिंदे, भिवंडी, 25 जानेवारी : भिवंडी शहर परिसरातून अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच सरवली येथून 19 वर्षीय युवक तर काल्हेरमधून 16 वर्षीय युवतीचे अपहरण अशा दोन दोन घटना समोर आल्या आहेत. आशिष विजयप्रकाश तिवारी आणि प्रिया रामनाथ गौड असं बेपत्ता झालेल्या युवक, युवतीचं नाव आहे.
सरवली येथे राहणारा आशिष विजयप्रकाश तिवारी ( 19) हा राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता झाला आहे. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो सापडला नाही. त्याचे वर्णन उंची 5 फूट 3 इंच ,अंगाने सडपातळ ,सावळा रंग ,नाक सरळ ,उजव्या हाताच्या दंडावर हनुमानाचे चित्र ( टॅटू ) गोंदलेले आहे. त्याचे वडील विजयप्रकाश तिवारी यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात मुलगा आशिष याच्या हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
आशिषच्या शोधासाठी वरिष्ठ पातळीवरून सदरचा गुन्हा भिवंडी गुन्हे शाखा युनिट क्र.2 यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे उपरोक्त वर्णनित युवकाची कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी भिवंडी गुन्हे शाखा घटक क्र.- 2 येथे संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी यांनी केले आहे.
तर दुसऱ्या घटनेत काल्हेर येथील युवती प्रिया रामनाथ गौड ( 16 ) ही घरात कोणाला काहीएक न सांगताच अचानकपणे बेपत्ता झाली आहे. तिच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. तिचे वर्णन उंची 4 फूट ,गहू वर्ण ,मध्यम बांधा ,डोळे व केस काळे ,नाक सरळ अंगात निळा शर्ट व काळी जिन्स पॅन्ट,पायात सिल्व्हर रंगाची सँडल असा पेहराव आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये SEX रॅकेटचा पर्दाफाश, समोर आली धक्कादायक माहिती
मुलगी बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्याने वडील रामनाथ गौड यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी नारपोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Crime news