नेहाल भुरे, प्रतिनिधी
भंडारा, 21 जानेवारी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केलं होतं. नाना पटोले यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. भारतीय जनता पक्षाने नाना पटोले यांच्या विरोधात रस्त्यावर उतर आंदोलन केली तर कुठे पोलिसांतही तक्रार दाखल केली. या प्रकरणावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत आपण स्थानिक गावगुंडाच्या संदर्भात बोलत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हा मोदी (Modi) नावाचा गावगुंड कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्याच दरम्यान आता भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) एका मोदी नावाच्या व्यक्तीला शोधून काढलं आहे.
कोण आहे हा भंडाऱ्यातील मोदी?
भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार संपल्यानंतर नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केले होते. पण नंतर नाना पटोले यांनी यूटर्न घेत मी देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी बोललो नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोलत असल्याचे वक्तव्य केले. त्याची चौकशी पोलीस करीत असून पोलिसांनी टोपण नाव असलेल्या मोदी याला शोधत त्याची विचारपूस केली आहे.
वाचा : नाना पटोलेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, देवेंद्र फडणवीसांनीही फटकारले
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात गोंदी गावातील उमेश प्रेमचंद घरडे नावाचा व्यक्ती आहे. या व्यक्तीला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी आणि संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतात. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो. दारू पिऊन गावकऱ्यांना तो शिवीगाळ करतो मात्र त्याच्याविरुद्ध पोलिसांत अजूनही कुठल्याही तक्रारी दाखल नाहीये. तसेच तो गावगुंड नाहीये.
पालांदूर पोलिसांनी उमेश घरडे याची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांनी कोणत्या मोदी विषयी भाष्य केले हा संशोधनाचा विषय आहे.
नाना पटोलेंना 'ते' वक्तव्य भोवणार?
नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या व्हिडीओत नाना पटोले हे मोदींना मारण्याची आणि शिव्या देण्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Video viral) होताच भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेत पटोलेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gakari) यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी."
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Nana Patole, काँग्रेस