मुंबई, 30 जानेवारी : बेळगाव प्रश्नाचा निकाल सुप्रीम कोर्टात लागत नाही, तोपर्यंत तो भाग केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली होती. या मागणीचे पडसाद कर्नाटकमध्येही उमटले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी (Lakshman Savadi) यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंबईत मोठ्या प्रमाणावर कन्नड नागरिक राहतात, त्यामुळे मुंबई हे शहर कर्नाटकशी जोडलं जावं, अशी कर्नाटकच्या जनतेची मागणी आहे. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा, असं वक्तव्य सावदी यांनी केलं होतं.
लक्ष्मण सावदी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी टीका केली आहे. उपमुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीने अक्कल वापरायला हवी, त्यांचं हे विधान निषेधार्ह असल्याचं भाई जगताप म्हणाले. तसंच महाजन समितीचा दाखला देऊन सावजी अशी मागणी करत असले, तरी तो अहवाल बेळगाव सीमाभागाशी जोडलेला आहे. मुंबईचा आणि त्या अहवालाचा काहीही संबंध नाही, असं प्रत्युत्तर भाई जगताप यांनी दिलं आहे.
तर दुसरीकडे भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेत्यांचाही समाचार घेतला आहे. मोठ्या बाता मारणाऱ्या भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना सावदी यांचं बोलणं खटकलं कसं नाही. कंगनासारखी दीड दमडीची नटी मुंबईची तुलना पाकिस्तानशी करत होती, तेव्हा तुमचे चमचे तिला झाशीची राणी म्हणत होते. आता मात्र सावदींच्या वक्तव्यावर भाजप मूग गिळून गप्प आहे. हे तुमचं मुंबईबद्दलच प्रेम आहे का? असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: देवेंद्र फडणवीस