बीड, 18 डिसेंबर : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आता बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत असतानाही त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हा खळबळजनक प्रकार घडला.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत नोकरी करत आहे. मात्र, त्याच्या नावाने मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तो सध्या गावामध्ये उपस्थित नाही. मात्र, तरीसुद्धा त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले. यासंदर्भात झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली, जावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - Gram Panchayat Election : 'मतदान केल्याचा व्हिडीओ काढून आणा अन् पैसे घेऊन जा' बीडमध्ये नेमकं काय घडलं?
विरोधी सरपंचपदाचा उमेदवार पाडण्यासाठी नवी शक्कल -
ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आली. याबाबत तक्रार करण्यात आली आहे. तर तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली. यामुळे मतदान तब्बल दीड तास बंद झाले होते. तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मतदान रोखण्यासाठी अजब फंडा वापरण्यात आला. त्यामुळे चक्क ईव्हीएम मशीन बदलावी लागली. या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता. मतदान प्रक्रियादेखील थांबवण्यात आली होती. सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed news, Crime news, Election