बीड, 31 मार्च : सोशल मीडियाचा योग्य वापर करुन बीडच्या कोळगावातील तरुण ब्लॉग व युट्युबच्या माध्यमातून महिन्याकाठी 3 ते 4 हजार डॉलर रुपये कमावत आहे. इंडियन करन्सीत म्हणजे भारतीय चलनाचा जर विचार केला तर ही रक्कम जवळपास 30 लाख रुपये इतकी आहे. म्हणजे महिन्याकाठी ही पोरं 30 लाख रुपये इतके पैसे कमावत आहेत. 300 ब्लॉगर्सच्या माध्यमातुन हे गाव लक्षाधीश झालं आहे. न्यूज 18 लोकमतने याचा विशेष आढावा घेतला.
बीडच्या गेवराई तालुक्यातील कोळगाव या गावाची लोकसंख्या साधारण तीन हजाराच्या घरात आहे. गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीचा आहे. मात्र, शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. शासनाच्या योजनांची सखोल माहिती मिळत नाही. हवामान, बी- बियाणे, खत, यासह विविध शेती विषयक माहितीही सखोलपणे मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळावी आणि आपला इथला शेतकरी प्रगतशील व्हावा, यासाठी गावातील अक्षय रासकर हा तरुण पुढं आला.
सोशल मीडिया शाप की वरदान हा विषय चर्चिला जात असताना बीड कोळगावाने कमाईचे माध्यम म्हणुन अमेरिकन डॉलरचा पाऊस पडणारे एक गाव म्हणुन ओळख निर्माण केली आहे. या गावात युट्यूबचे जुगाड केले आणि अख्ख्या गावात जवळपास 300 ब्लॉगर्स तयार केले. यामुळे या गावात प्रत्येक महिन्याला अमेरिकन डॉलरचा पाऊस पडतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अक्षय रासकर यांनी साधारण गेल्या 10 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना माहिती मिळावी आणि आपल्याला दोन पैसे मिळावेत या उद्देशाने ब्लॉग (पोर्टल) आणि युट्यूब चॅनल सुरू केले. असे करत त्यांनी एका ब्लॉगचे 12 ब्लॉग सुरू केले. यातून शेतकऱ्यांना तर फायदा झालाच. मात्र, त्यापेक्षा जास्त अक्षय रासकर या तरुणाला याचा झाला. महिन्याकाठी रासकर यांना गुगलकडून लाखो रुपये मिळू लागले.
पाहता पाहता त्यांची कमाई ही महिन्यासाठी 3 हजार ते 4 हजार अमेरिकन डॉलरच्या घरात गेली. हे सर्व करत असतांना त्यांनी गावातील तरुणांना देखील सोबत घेतले आणि आजघडीला या गावात जवळपास 300 ब्लॉगर्स तरुणांचा ग्रुप आहे. विशेष म्हणजे आजघडीला अक्षय रासकर यांचे 40 ब्लॉग (पोर्टल) असून यातून महिन्याकाठी त्यांना जवळपास 30 लाख रुपये मिळत आहेत. त्यापैकी ते त्यांच्या सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलांना 60 / 40 चा क्रायटेरिया ठेऊन लाखो रुपये कमाई करून देतात.
विशेष म्हणजे या गावातील महाविद्यालयीन काही तरुण कॉलेज करत, अक्षय रासकर यांच्या गावातील ऑफिसमध्ये बसून, काही तास काम करतात आणि यामधून त्यांना लाखो रुपये मिळत आहेत. तर मिळणाऱ्या पैशातून गावातील तरुण आदित्य पाटील आणि सौरभ या दोघांनीही गावात घर बांधनं सुरू केले आहे. एकाने तर महागडा आयफोन घेतला आहे. कॉलेजला जाण्यासाठी स्पोर्ट बाईक घेतली आहे. विशेष म्हणजे यातील सौरभने छत्रपती संभाजीनगर येथे आलिशान प्लॅट देखील घेतलाय.
तर अक्षय रासकर यांना सोशल मीडियावर पाहून दूर दूरहुन तरुण मंडळी भेटायला येत आहेत. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते निस्वार्थ भावनेने माहिती देखील सांगत आहेत. तर यापैकी संभाजी काळे हे व्यावसायिक आहेत. मात्र, त्यांनादेखील ब्लॉग सुरू करायचा आहे, असे म्हणत त्यांनीही कोळगाव गाठले. तर जालना जिल्ह्यातील राहुल यांनी देखील रासकर यांच्या ऑफिसला भेट देत माहिती घेतली. दरम्यान हे ऑफिस पाहून अन माहिती ऐकून त्यांना देखील समाधान वाटलं.
दरम्यान, आतापर्यंत याच बीड जिल्ह्याची ओळख ही स्त्रीभ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी होती. मात्र, अक्षय रासकर या तरुणामुळे ब्लॉगर्स तयार झाल्याने आज बीडचं कोळगाव हे डॉलरचा पाऊस पडणारं गाव, अशी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळं सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मोबाईलवर गेम आणि सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा अक्षय रासकर यांचा आदर्श घेऊन काम केले तर नक्कीच त्यांचे देखील जीवनमान उंचावेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Inspiring story, Social media, Youtubers