सुरेश जाधव, प्रतिनिधी
परळी, 28 मार्च : शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर महिला आयोगाने संजय शिरसाट यांना नोटीस पाठवली आहे, दुसरीकडे सुषमा अंधारे संजय शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. परळी पोलीस स्टेशनमध्ये सुषमा अंधारे यांनी ठिय्या धरला. संजय शिरसाट यांच्यावर अब्रूनुकसानचा दावा ठोकणार असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या, तसंच त्यांच्या बोलण्यातून माज जाणवतो, अशी टीकाही अंधारे यांनी केली.
'जातीच्या कार्डचा वापर मी करत नाही, लोक मला जातीबाबत विचारतात. मी मुख्य प्रवाहात बोलत आहे, म्हणून मला ट्रोल करण्यात येत आहे. माझ्यावर खूप चांगले संस्कार आहेत, म्हणून मी कुणालाही एकेरी भाषेत बोलत नाही. अजितदादांना दादा बोललो तर त्यांना टोचत नाही, आर.आर.पाटील यांना आबा म्हणलं तर त्यांनाही त्याचं काही वाटायचं नाही, पण संजय शिरसाटांना मी भाऊ म्हणलं तर त्यांना ते खूप लागलं,' असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
पवारांनी खडसावलं, ठाकरेंनी सुनावलं, सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधी बॅकफूटवर!
'संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांनी महिलांबाबत गलिच्छ भाषा वापरली आहे. महिलांबाबत ते अभद्र बोलले आहेत. सार्वजनिक ठिकाणी शिरसाट माझ्याबद्दल बोललेआहेत, यांच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार?' असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
'तुम्हाला भाऊ आणि दादा हे शब्द टोचत असतील तर शिवी वाचक शब्द सुचवा. मी देवेंद्र फडणवीस यांनाही विचारणा केली आहे. त्यांच्या भूमिकेकडे माझं लक्ष आहे. हे सगळं कुभांड का रचलं जातंय? माझ्यावर कोणतंही बॅगेज नाही, मी बाईपणाचं कोणतंही कार्ड खेळणार नाही. ना माझ्यावर ईडीची कारवाई झाली. मी फक्त विकृत प्रवृत्ती ठेचण्यासाठी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत आहे. मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो. त्यामुळे जशास तसं उत्तर देणार,' असा इशारा सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.