ऊसबीड, 20 मार्च : आजारी मजुराला कामावर का येत नाही म्हणून मुकादमाने जबर मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एकी धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोडणीचे पैसे दारूवर का उडवता? असा जाब विचारणार्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून पतीने निर्घृणपणे खून केली आहे. ही घटना बीडच्या भेंडटाकळी तांडा येथे उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह अन्य दोन जणांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सविता राठोड (वय 36 वर्षे) अस मयत महिलेच नाव आहे.
काय आहे प्रकरण?
सविता आणि सुरेश राठोड हे पती-पत्नी ऊसतोडणीला गेलेले होते. काल नातेवाईकांच्या लग्नानिमित्त ते भेंडटाकळी तांडा या आपल्या गावी आले होते. रात्री पती-पत्नीमध्ये पैशाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. ऊसतोडणीचे पैसे दारूमध्ये का उडवता? असा जाब पत्नीने पती सुरेश राठोड याला विचारला असता पतीने सविता हिच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृणपणे खून केला. या प्रकरणी सविताचा भाऊ विलास बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुरेश गुलाबराव राठोड (पती, वय 45 वर्षे), भगवान राठोड (दिर), विनोद राठोड (पुतण्या) या तिघांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा - आधी कारने धडक, मग गोळीबार अन् कोयत्याने वार; नाशकात भरदिवसा सिनेस्टाईल थरार
धारुर तालुक्यात मुकादमाने केलेल्या मारहाणीत ऊसतोड मजुराचा मृत्यू
आजारी असलेल्या मजुराला कामवर का येत नाही म्हणत मुकादमाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी येथे उघडकीस आली. ऊसतोड कामगार श्रीराम आण्णासाहेब कसबे हे आजारी असल्याने काम करू शकत नसल्याने मुकादम व ट्रक मालकांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार मयत ऊसतोड कामगाराच्या पत्नीने धारुर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावरून दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
माजलगाव तालुक्यातील सोन्नथडी येथील ऊसतोड कामगार श्रीराम आण्णासाहेब कसबे हे आजारी असल्याने काम करू शकत नव्हते. मात्र, 16 मार्च रोजी मुकदम अशोक कसबे व ट्रक मालक गंगाधर तिडके यांनी त्यांना दुसऱ्या ट्रकमध्ये भोगलवाडी येथे घेऊन गेले. रागात मुकदम अशोक कसबे व ट्रक मालक गंगाधर तिडके यांनी केलेल्या मारहाणीत पती श्रीराम कसबे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुकादम व ट्रक चालकाविरुद्ध 17 मार्च रोजी रात्री उशिरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.