रोहित देशपांडे, प्रतिनिधी
मुंबई, 3 फेब्रुवारी : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण मागच्या वर्षी साजरा केला. संपूर्ण महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बस सेवेचंही हे 75 वं वर्ष आहे. 'गाव तिथं एसटी' हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्यासाठी एसटीच्या बस राज्याच्या कानाकोपऱ्यात रोज धावतात. बीड जिल्ह्यातील दोन गावं मात्र एसटीपासून अद्याप वंचित होती. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपलीय. तब्बल 75 वर्षांनंतर या गावात एसटी धावली आहे.
का झाला उशीर?
बीड जिल्ह्यातल्या धारूर या तालुक्यातील काळ्याचीवाडी, मांजरकडा तांडा, या गावांमध्ये एसटी पहिल्यांदा धावलीय. या गावांमध्ये जाण्यासाठी डांबरी रस्ताच नव्हता. त्यामुळे इथं गेली साडेसात दशकं एसटी पोहचू शकली नव्हती.
मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या परिसरात पंतप्रधान सडक योजनेतून डांबरी रस्ता तयार करण्यात आला. बस धावण्यासाठी योग्य रस्ता झाल्यानं या गावकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून त्यांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
'या' रिक्षाचा थाटच और, प्रत्येक प्रवासी पडतो प्रेमात! पाहा Photos
धारूर तालुका हा डोंगराळ, भाग असून या ठिकाणी असणाऱ्या अनेक गावांमध्ये रस्ते नसल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा नीट नाहीत. पण आता या गावांमध्येही बदल होत आहेत. या परिसरातही रस्त्यांचं जाळं वाढत असून त्यामुळे येथील सुधारणा आता होऊ लागल्या आहेत.
काळ्याचीवाडी आणि मांजरकडा तांडा या गावात यापूर्वी बस जात नव्हती. आता रस्ता झाल्यामुळे आम्ही या मार्गावर बससेवा सुरू केली आहे. दिवसभरातून बसच्या दोन फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती आगारप्रमुख शंकर स्वामी यांनी दिली. तर, गावामध्ये रस्ते नसल्यानं वाहतुकीचा मोठा प्रश्न होता. आता गावातून बस सेवा सुरू झाल्यानं आम्हाला आनंद झालाय, असं येथील ग्रामस्थ परमेश्वर तिडके यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.