रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 26 मार्च: राज्यातील विविध भागात विशेषत: मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर असतो. पाण्यासाठी सरकारी पातळीवर विविध प्रकल्प, योजना राबविल्या जात असतात. तसेच जिल्हा ते गाव पातळीपर्यंत विविध उपक्रमही राबविले जातात. असाच एक उपक्रम राज्य सरकारकडून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राबविला जात आहे. बीड जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला आहे.
अल्प प्रतिसाद
पावसाचे वाहून जाणारे पाणी जागीच जिरवण्यासाठी सर्व कार्यालय, शैक्षणिक संस्थांसह सोसायटी, शासकीय कार्यालयांमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावरून वारंवार सूचना देखील केल्या जातात. मात्र बीड जिल्ह्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प तुरळक कार्यालय आणि संस्थांनीच राबविला आहे.
जनजागृती आवश्यक
बीड जिल्ह्यामध्ये अनेकदा दुष्काळाच्या झळा देखील सोसाव्या लागल्या आहेत. पाण्यासाठी अनेक गावांमधील महिलांनी कोसो मैल पायपीट देखील करावी लागत होती. मात्र याच जिल्ह्यामध्ये जर सर्वच शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला तर याचा फायदा भविष्यातील पिढीला होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाविषयी जिल्ह्यात जनजागृती होणे गरजेचे आहे.
काय आहे रेन हार्वेस्टिंग प्रकल्प?
बीड जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर बीडकरांना अनेकदा दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. आपल्या जिल्ह्यातील शाळा शासकीय कार्यालय छतावर जे पावसाचे पाणी पडते ते वाहून नाल्यावाटे वेस्टेज मध्ये जाते. त्याऐवजी हे पाणी संकलित केलं आणि आपल्या परिसरामध्ये असणारे बोर किंवा विहिरीमध्ये फिल्टर करून सोडलं तर भूजल पातळीमध्ये नक्की वाढ होते, असे भूवैज्ञानिक रोहन पवार यांनी सांगितले आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो, कृषी विभागानं दिला तुमच्या पिकांसाठी महत्त्वाचा सल्ला!
रेन वॉटर हार्वेस्टिंग फायदे
योग्य प्रकारे जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते. गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Local18, Water crisis