बीड, 26 नोव्हेंबर : बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या जुन्या वादातून पुतण्यानेच वयोवृद्ध चुलता, चुलतीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे, तर महिलेवर उपचार सुरू आहेत. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे ही घटना घडली आहे. बळीराम मसाजी निर्मळ वय 80 वर्ष आणि केसरबाई बळिराम निर्मळ वय 70 वर्ष असं या दाम्पत्याचं नाव आहे.
हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील मुळुकवाडीमध्ये आज सकाळी सात वाजता बेसावध असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्यात या दाम्पत्याला प्रतिकार करण्याची देखील संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीपत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बळीराम निर्मळ यांना डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषीत केले तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केसरबाई बळिराम निर्मळ यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल
दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रोहीदास विठ्ठल निर्मळ वय 50 असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed