बीड, 2 जानेवारी : मतदार यादीमध्ये बोगस नावं घुसवण्याचे प्रकार अनेकवेळा समोर येतात, पण एकाच जिल्ह्यात सारख्या चेहऱ्यांचे हजारो मतदार असतील तर? बीड जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस मतदान नोंदणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये सारख्या चेहऱ्यांचे तब्बल 61 हजार 270 मतदार असल्याचं समोर आलं आहे. यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असण्याची शक्यताही प्रशासनाने व्यक्त केली आहे. यात एकाच मतदाराने दोन-दोन तीन-तीन ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदणी केल्याने असे प्रकार घडत असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
एकाच मतदाराची दोन-तीन ठिकाणी नोंदणी करून बोगस मतदान करण्याचं रॅकेट सक्रीय असल्याचा आरोप बीडमधले सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केला आहे. निवडणूक अधिकारी आणि राजकीय नेते याचा गैरवापर करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
प्रशासनाने आता फोटोवरून साम्य असलेले 61 हजार मतदार शोधले, हा आकडा खूप मोठा आहे. यामुळे निवडणुकीच्या निकालावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नावामधील साम्य असलेले बोगस मतदारही कमी करावेत, अशी मागणी ढवळे यांनी केली आहे.
निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम नियमितपणे सुरू आहे, त्यात मतदारांच्या नोंदणीसह यादीतील दुरुस्तीचा समावेश आहे. या दरम्यान, एकाच मतदारांची नावे ही वेगवेगळ्या मतदारसंघात असल्याचेही दिसून येत आहे. साम्य असलेल्या मतदारांची संख्या 61, 270 आहे.
मतदारांच्या चेहऱ्यांमध्ये साम्य असलेल्या मतदारांची संख्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये वेगवेगळी आहे. या संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी यांना विचारले असता, त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला, यामुळे प्रशासन कुठेतरी ही माहिती लपवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
गेवराई 8,118, माजलगाव 10,461, बीड 12,819, आष्टी 8,157, केज 12,135, परळी 9,880 अशी सारख्या चेहऱ्यांचं मतदार कार्ड असणाऱ्यांची संख्या आहे. एकाच व्यक्तीची दोन कार्ड असल्याने यादीतील चेहऱ्यांमध्ये साम्य दिसत आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील चेहऱ्यांमध्ये साम्य असलेल्या 61 हजार 270 मतदारांच्या बाबतीत कार्यवाही करून त्यातील मतदारांचे नाव एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीशी संबंधित संपर्क साधून त्यांचे एक मतदान कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच दोन ठिकाणी मतदार यादीत नाव आढळून आल्यास त्याच्यावरती कारवाई देखील केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.