सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 21 मार्च : जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. गारपीट होऊन गेल्यानंतर याची दाहकता समोर येत आहे. धारूर तालुक्यात धुनकवड गावातील तरुण शेतकरी कल्याण कुलकर्णी यांच्या शेतातील 1100 आंब्याची झाडे आहेत. त्यावर बहरलेले आंबे पाहून यावर्षी आंबे कमी असल्याने भाव चांगला मिळून 25 ते 30 लाखाचे उत्पन्न निघेल अशी स्वप्न कल्याण कुलकर्णी यांनी पाहिली होती. मात्र, पंधरा मिनिटाच्या गारपिटीने या शेतकऱ्याच्या आंब्याच्या बागेचं होत्याचं नव्हतं केलं आहे. जवळपास अंदाजे 15 टन आंब्याचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या धारूर तालुक्यात धूनकवडच्या डोंगरावर भगीरथ प्रयत्नातून आंब्याची आणि मोसंबीची बाग फुलवली. तळहाताच्या फोडाप्रमाणे आणि टँकरने पाणी देऊन कल्याण कुलकर्णी यांनी गेल्या पाच वर्षापासून ही फळबाग जोपासली आहे. 1000 झाडावर लगडलेले आंबे पाहून कल्याण कुलकर्णी यांनी 35 ते 40 लाखाची उत्पन्न होईल अशी अपेक्षा धरली होती. मात्र, दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीने हा शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. अवघ्या पंधरा ते वीस दिवस तोडणीचा हंगाम आलेल्या या आंबा पिकावर गारांच्या मारामुळे आंबा जमिनीवर पडला आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कच्चा आंबा मातीमोल भावाने विकावा लागला. नुकसान भरून न निघणारे आहे. शासन 30-35000 हजार देईल. मात्र, त्यामध्ये 25-30 लाखाची नुकसान कसे भरून काढायचे? असा सवाल कल्याण कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. शेवटी एवढे नुकसान होत असेल तर शेतकरी आत्महत्या करेल नाहीतर काय असा उद्विग्न सवाल ही त्यांनी केला आहे.
वाचा - Latur News : गारपीटीनं शेतकऱ्यांची पिकं आडवी, पाहणी करताच पालकमंत्र्यांनी दिले आदेश, Video
तरुण शेतकरी शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे फोनही आले होते. यावर्षी आंब्याची लागण कमी असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात होणार होती. म्हणून व्यापाऱ्यांनी अगोदरच फळबागा बुक करून ठेवल्या होत्या. दोनशे रुपये किलो प्रमाणे भाव यावर्षी मिळाला असता तर तब्बल 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र, पंधरा मिनिटांच्या गारपिटीने 15 टन आंबा खाली पडला, जो झाडावरती होता. तो पूर्ण गारांचा मार लागून डागाळला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.