बीड, 30 जानेवारी : तणाव आणि चिंता हा आजच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. यावर मात करण्यासाठी जगभरातील लोक विविध उपाययोजना करत आहेत. टेन्शन किंवा तणाव फक्त मोठ्यांनाच येतं असं नाही, तर ते लहान मुलांनाही येतं. त्यातल्या त्यात परीक्षा जवळ आल्यावर त्यांचं टेन्शन वाढतं. अशा परिस्थितीत मुलांशी पालकांनी काळजीपूर्वक वागायला हवं. बीडमध्ये गेल्या वर्षभरात 30 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवले आहे.
सध्याच्या काळात शिक्षण पद्धती बदलत चाललेली आहे. लहान वर्गापासून ते उच्च शिक्षण करण्यापर्यंत वेगवेगळे क्लासेस, नोट्स, ऑनलाइन क्लासेस, यासह ऑफलाइन, क्लासेस पाहायला मिळतात. आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन एखादा अधिकारी किंवा डॉक्टर, इंजिनिअर, झाला पाहिजे अशी अपेक्षा पालकांची असते. परीक्षेदरम्यान मुलांना ताण आलाय किंवा चिंता वाटत असेल तर अशा स्थितीत पालकांनी त्यांना समजून घेतले पाहिजे.
तणावातून 16 आत्महत्या
दहावी, आणि बारावीच्या, परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच परीक्षा काळात अभ्यासाचे टेन्शन घेतल्यामुळे अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलू शकतात. बीड जिल्ह्यामध्ये मागील वर्षभरामध्ये 30 विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. यामधील 16 आत्महत्या या अभ्यासाच्या तणावातून झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 9 मुली तर 7 मुलांचा समावेश आहे. तर बाकीच्या आत्महत्या इतर कारणावरून झाल्या आहेत.
मुलांच्या आवडी ओळखा
स्पर्धा परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असते. मात्र पालक त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादतात. यामुळे मुलं दडपणात येऊन, तणावाखाली टोकाचे पाऊल उचलू शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आवडी लक्षात घेणे आवश्यक आहेत. त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रातच करिअर करण्याची संधी दिली तर मुलं यशस्वी होऊ शकतात.
Ahmednagar : आठवीच्या मुलानं बनविली सोलार इलेक्ट्रिक कार! पाहा Video
मुलांना योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे
मुलांच्या कॅपॅसिटी प्रमाणे अपेक्षा करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिकच्या अपेक्षा करू नयेत. मुलांना समजून घेऊन त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणं आवश्यक आहेत. ताणतणाव, नैराश्य, अपयश आलं तर मुलं टोकाचे पावले उचलू शकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक, नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.