बीड, 19 जानेवारी : नैराश्य, ताणतणाव हा आजकाल भयानक मोठा आजार होत आहे. तरुण पिढी, शेतकरी मोठ्या प्रमाणात नैराश्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. तणावातून अनेकदा टोकाचे पाऊल उचलले जाते. अशावेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. यासाठी बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा कक्ष नागरिकांना तणावमुक्त करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संजीवनी ठरत आहे.
कौटुंबिक कलह, तणाव, अपयश, व्यसन, न्यूनगंड, गरिबी, कर्जाचे ओझे यातून नैराश्य येत असून आत्महत्येचे प्रकरणे वाढत आहेत. बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये प्रकल्प प्रेरणा कक्षाची स्थापना 2016 रोजी करण्यात आली. याच्या माध्यमातून अनेकांचे समुपदेशन करून अनेकांना तणाव मुक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 200 पेक्षा अधिक आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तणावातून या केंद्राने बाहेर काढले आहे. तर 3 हजार लोकांचे समुपदेशन देखील करण्यात आले आहे.
डिलिव्हरीचा मोठा खर्च वाचवण्यासाठी 'ही'हॉस्पिटल ठरतायत वरदान, Video
तणावात जाण्याची कारण
बीड जिल्ह्यात कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तणाव, नैराश्य येतं यातून अनेक आत्महत्याचे प्रकरणे समोर आली आहेत. तरुणांमध्ये लग्न न होणे, परिवारातील आर्थिक अडचण, डोक्यावर असणारे कर्ज, पतीसोबत होणारे वाद, व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अधिक प्रमाणात वापर, अभ्यासाचा ताण, अशा कारणांमुळे अनेकांना आत्महत्येचे विचार येतात.
मोफत समुपदेशन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह मानसिक तणावात असणाऱ्या रुग्णांसाठी 2016 रोजी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तणावात असणाऱ्या रुग्णाला किंवा आत्महत्या करण्याचे विचार येणाऱ्यांचे समुपदेशन केले जाते. 104 आणि 1441 हा संपर्क क्रमांक नागरिकांसाठी देण्यात आला असून याद्वारे नागरिक मोफत समुपदेशन मिळवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.