मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भोग इथले संपत नाही, मरणानंतरही यातना, बीडमधलं धक्कादायक वास्तव

भोग इथले संपत नाही, मरणानंतरही यातना, बीडमधलं धक्कादायक वास्तव

बीडमधलं धक्कादायक वास्तव

बीडमधलं धक्कादायक वास्तव

भावनानगरच्या गावकऱ्यांना रस्ता चांगला नसल्याने गुडघाभर चिखलातून स्वतःला सावरत अंत्यविधीसाठी जावं लागतं हे वास्तव आहे.

बीड, 10 ऑगस्ट : बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव-भगवाननगर गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अंत्यविधीसाठी जातांना नागरिकांना गुडघाभर पाणी आणि चिखल तुडवत जावे लागत आहे. त्यामुळे मरणानंतरही इथल्या लोकांचा वनवास सुरूच आहे, असं चित्र आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव-भगवाननगर ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. भगवाननगरमध्ये शंभर कुटुंब राहतात. त्यामुळे लोकसंख्या देखील 800 च्या जवळपास आहे. मात्र या गावाला जोडणारा रस्ता कच्चा असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भावनानगरच्या गावकऱ्यांना रस्ता चांगला नसल्याने गुडघाभर चिखलातून स्वतःला सावरत अंत्यविधीसाठी जावं लागतं हे वास्तव आहे. घरातील जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे दुःख तर आहेच मात्र अखेरचा निरोप देताना देखील गुडघाभर पाण्यातून आणि चिखलातून चालताना त्यांच्या वाट्याला जे दुःख येते ते शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाहीय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करताना या गावाच्या वाट्याला रस्त्याचा वनवास मात्र कायम आहे. गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वारंवार निवेदन आणि तक्रारी दिल्या. मात्र या रस्त्याचा प्रश्न काही सुटायचं नावच घेत नाहीय. दरम्यान काल याच गावातील कोंडीबा मुंडे या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना नागरिकांना स्मशानभूमीकडे घेऊन जाताना तब्बल एक किलोमीटर गुडघाभर चिखलाचा प्रवास पार करावा लागला. मृतक व्यक्तीच्या नातेवाईकांना यावेळी जीव मुbeedठीत धरून प्रवास करावा लागला. त्यामुळे जीवंतपणी मरण यातना सोसाव्या लागतातच पण आता मरणानंतरही यातना सोसाव्या लागत आहेत हे दुर्देवं आहे. त्यामुळे या परिस्थितीवरुन गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. (बीडमध्ये ग्रामसेवकाचं लज्जास्पद कृत्य, गतीमंद मुलगी पाणी भरत असताना संतापजनक प्रकार) "आम्हाला ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीय. त्यामुळे बाजाराला देखील जाता येत नाही. रस्त्यामुळे लोक मरत आहेत. आजारी व गर्भवती महिलांचे तर मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मयताला जाताना देखील कसरत करत जावं लागतं. आमची शेवटी दया कोणाला येणार आहे की नाही?", अशा शब्दांमध्ये गावकरी विमलबाई पाटोळे यांनी संताप व्यक्त केला. "रस्त्याच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. गरोदर महिला असतील तर त्यांची वाटेतच डिलिव्हरी होते. आता नवीन सरकार स्थापन झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी आमची रस्त्याची अडचण सोडवावी", अशी कळकळीची विनंती ग्रामस्थ काशिनाथ मरळकर यांनी केली. अनेक वर्षांपासून आम्ही गावातील रस्ता व्यवस्थित व्हावा यासाठी शासन दरबारी खेटा मारल्या. लोकप्रतिनिधींना निवेदन देखील दिले. मात्र रस्त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. यामुळे आता गावकरी सर्वजण संतापलो आहोत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिला. तात्काळ या गावातील लोकांचा रस्त्याचा वनवास मिटवावा अशी मागणी ग्रामस्थांना केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील ग्रामस्थांना दिला आहे. बीड जिल्ह्यात आजही अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे नवीन सरकारमधील मंत्र्यांनी लोणगाव-भगवाननगरच्या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडून इथल्या लोकांच्या मरण याताना थांबवाव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या